वैजापूर, (प्रतिनिधी) : नगरपालिका व महानगर पालिका निवडणुकीची धाम धूम संपताच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याचे वेध लागले. अनेकांनी उमेदवारी पक्षाकडून मिळाली तर तर ठीक नसता अपक्ष लढण्याची तयारी देखील सुरु केली आहे.
पंचायतराजमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण विकासासाठी मिनी मंत्रालय म्हणून महत्वाची भूमिका बजावतात. जिल्हा परिषदेचा कारभार जरी (सीईओ) पाहत असले तरी धोरणात्मक निर्णय व आर्थिक चाव्या या सदस्यांच्या हातात असतात. जिल्हा परिषदेमार्फत रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण व्यवस्था इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो झेडपी अध्यक्ष व सदस्य यांना गावगाड्यात महत्त्वाचा निवडणूक मान सन्मान असतो. तीन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने राजकीय नेत्यांची जनतेशी असलेली नाळ काही प्रमाणात कमी झाली होती.
आता निवडणुका जाहिर झाल्याने कार्यकर्ते व नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे जनसेवा करता करता या आर्थिक तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात, असाव्यात म्हणून अनेकांनी आता पासून मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
या निवडणुकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदाराला २ मत देणे बंधनकारक आहे. एक जिल्हा परिषद साठी तर दुसरे पंचायत समितीसाठी. येणाऱ्या निवडणुकीत आर्थिक तसेच जातीचे समीकरण महत्वाचे ठरणार आहे. वैजापूर नगरपालिकेसाठी लक्ष्मी दर्शनाचे कोटीच्या कोटी उड्डाणे झाल्याने त्याचा सुद्धा परिणाम ग्रामीण भागातील या निवडणुकीवर नक्कीच होणार. त्यामुळे फक्त सामाजिक काम करणारे उमेदवार असून चालणार नसून आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवारच या निवडणुकीत महत्वाचे भूमिका निभावणार आहे.
वैजापूर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती महिला उमेदवार साठी राखीव झाले आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते पूल शाळा पेय जल योजना शाळेत शिकवायला शिक्षक नसणे, तसेच रस्त्याचे झालेले निकृष्ट कामे शेतात जाण्यासाठी शिव रस्ता नसते शेतकरी अनुदान व निवडून आलेले नेते गावात न राहता जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कारभार करतात.
अनेक ठिकाणी मतदार आता प्रस्थापितांना कंटाळले आहेत. नवीन नेतृत्वाला संधी द्यावी, असा मतदारांचा कल असून अनेक ठिकाणी गावातीलच उमेदवार असावा अशी आग्रहाची मागणी मतदार करत आहेत. जनता नेमकी कोणाला स्वीकारते व कोणाला नाकारते हे निकालांती स्पष्ट होईल.














